CT प्रशिक्षणानंतरचा एक अनुभव
गेल्या 5-7 दिवसांपूर्वीची गोष्ट, नेहमीप्रमाणे सकाळी 10 च्या आसपास बसने शिरपुर स्थानकात प्रवेश केला. गाडीतुन उतरतांना खिडकीतुन लक्ष गेले . एक महिला तिच्या लहान बालकाला मांडीवर खेळवत झाडाखाली बसली होती. मांडीवर असलेल्या त्या बाळाची लक्षणे थोडी वेगळी दिसत होती, विशेष शिक्षकाच्या नजरेतुन ती सुटली नाहीत. मी खिडकीतुनच त्या महिलेच्या पतींना विचारले की हा मुलगा चालत नाही का ? त्यावर त्यांनी नकारार्थी मान हलवताच मला मी न चुकल्याचा मनस्वी आनंद झाला. मी खाली उतरून त्यांच्याजवळ गेलो व त्यांची विचारपुस करण्यास सुरुवात केली. त्याचे नाव तुषार विनोद पाटील असुन तो नुकताच 6 वर्षांचा झाला आहे असे त्याचा आईने सांगितले. प्रथम मी त्यांना माझी ओळख करून दिली. तुषार हा Mix learner असुन वैद्यकीय दृष्टया तो Cerebral palsy या प्रकारात मोडतो. मी त्यांना विचारले की तुम्ही त्याला डॉक्टरांकडे घेऊन गेले होते का? तर ते म्हणाले की हो सर आम्ही घेऊन गेलो होतो. डॉक्टरांनी त्यांना सांगितले होते की तुषारला बुद्धी नाही, त्याला काहीच समजत नाही, तुम्ही त्याला तो जेवढे दिवस आहे तेवढे दिवस खाऊ पिऊ घाला. ही सर्व कहाणी तुषारची आई आणि वडिलांनी खुप उद्विग्नपणे संगीतली. ते म्हटले की आम्ही त्याच्यासाठी खुप प्रयत्न केले सर पण काहीच उपयोग झाला नाही.
शेवटी मी माझ्याकडून जे समजवायचे होते ते सांगायला सुरवात केली. सर्वप्रथम मी त्यांना सांगितले की डॉक्टर तुमच्याशी खोटं बोलले की तुषारला बुद्धि नाही. मी त्यांना उलट प्रश्न केला की जर तुषारच्या डोळ्यासमोरून तुम्ही दोघे 30/40 मिनिटांसाठी त्याला दिसेनासे झालात व काही वेळात त्याच्यासमोर आलात तेव्हा त्याची प्रतिक्रिया काय असते ? आई खूप आनंदाने म्हणाली की सर तो मला पाहुन खुप हसतो व हातपाय हलवतो. मग जर तुषारला बुद्धि नसती तर तो आईला पाहुन हसला असता का ? तो तुम्हाला पाहुन हातपाय हलवतो याचा अर्थ त्याला तुमच्याकडे/ त्याच्या आईकडे यायचं आहे. म्हणजेच त्याची बुद्धि काम करतेय परंतु त्याचे शरीर त्या सूचना एकत नाहीये. हे ऐकून आई अगदीच प्रसन्न झाली आणि म्हणाली की सर तसा तर तो खुपच हुशार आहे. तहान लागल्यावर पाणी असे काहीसे शब्द तो बोलतो. मी सांगितले की तुषार खरच खुप हुशार आहे, त्याचा मेंदू चांगला आहे परंतु त्याचे शरीर त्याला साथ देत नाहीये. म्हणुन आपल्याला त्याच्या शरीराच्या स्नायुंना सक्रिय करायचे आहे त्यासाठी तुमची दोघांची(आई-वडील) मेहनत खुप महत्वाची आहे. सर्वप्रथम येत्या वर्षापासून आपल्याला तुषारला इयत्ता पहिली मधे दाखल करावे लागेल. शाळेत दाखल केल्यामुळे त्याला ज्या सहाय्यभूत साधनांची गरज आहे की ज्यामुळे त्याच्या हालचालीत वाढ होईल ती साधने आपल्याला त्याला शाळेच्या माध्यमातुनच उपलब्ध करता येतील. तसेच आपल्याला त्याला सुरवातीलाच अक्षरलेखन,वाचन, अंक ओळख ही कौशल्य शिकवायची नाहीत तर त्याला आपण त्याच्या गरजेनुसार शिकवणार आहोत. आज तुषारची गरज ही आहे की त्याला स्वतःच्या हाताने जेवण करता यायला हवे, कपडे घालता यायला हवेत, शी-शू सारख्या क्रिया त्याला सांगता यायला हव्यात. पालकांना हे म्हणणे पटले की हो सर ह्याच कौशल्यांची त्याला सद्द्या गरज आहे. आपल्याला त्याला स्वावलंबी बनवायचे आहे की जेणेकरून तो त्याच्या दैनंदिन क्रियांसाठी पालकांवर अवलंबून राहायला नको, कारण आज तुम्ही (आई -वडील) हयात आहात म्हणुन ठीक आहे, भविष्यात तुम्ही गेल्यानंतर त्याचे काय ? म्हणुन त्याला आत्मनिर्भर करणे प्रथम गरजेचे आहे हे समजावून सांगितले. मी तुषारचे हात पाय थोडे दाबुन पाहिलेत की जेणेकरून त्याला किती तीव्र संवेदना जाणवतात, हे सर्व करतांना त्याच्या चेहऱ्यावर मला एक विलक्षण आनंद जाणवला जी माझ्या खऱ्या कामाची पावती होती. फिजियोथेरेपी द्वारे त्याचे स्नायु सक्रीय होऊ शकतील म्हणुन त्याला सतत फिजियोथेरेपी कशी द्यावी याची प्राथमिक माहिती प्रत्यक्ष कृतीद्वारे त्यांना करून दाखवली.
तब्बल 30 ते 35 मिनिटे त्या पालकांशी हितगुज साधल्यावर त्यांना जे समाधान मिळाले ते शब्दात मांडणे निव्वळ अशक्यच. तुषार हा हनुमंतखेडे ता. एरंडोल जिल्हा जळगाव येथील आहे. तो कुठला आहे याचा मला काही फरक पडत नाही कारण मी दिव्यांग मुलांसाठी काम करतो मग मला तालुक्याची, जिल्ह्याची सीमा का म्हणुन आडवी यावी ? तो निव्वळ माझ्या कार्यक्षेत्रातला नाही म्हणुन मी त्याला तशाच अवस्थेत सोडून देणे हे मला न पटणारे होते. माझ्याच गावचे आमचे जेष्ठ सहकारी गुरुदास शिंपी हे एरंडोल गट साधन केंद्रात समावेशित साधनव्यक्ती या पदावर कार्यरत आहेत. मी लगेच त्यांना फोन करून सर्व माहिती सांगितली की सर तुषार हा खुप हुशार विद्यार्थी आहे त्याला इयत्ता पहिलीला येत्या वर्षी नक्की दाखल करा व त्याला आवश्यक ते सहाय्यभूत साधने उपलब्ध करून द्या. सरांनीही माझ्या शब्दाला मान देऊन मला शब्द दिला की सर काही दिवसात मी स्वतः त्याची गृहभेट घेऊन सर्व माहिती घेतो व येत्या वर्षात त्याला शाळेत दाखल करून शक्य ते सर्व प्रयत्न मी करत राहीन. आपल्या जिल्ह्यातील आकडी मष्तिष्क शिबिरातही त्याला उपस्थित ठेवावे हा मानस आहे त्यादृष्टीने त्याला आणावे यासाठी मी सर्व माहिती त्यांना लिहून दिलेली आहे.
CT चे प्रशिक्षण मी प्रभावी पणे घेतल्यामुळेच आज मी जे काही देऊ शकलो त्यामुळे तुषारच्या पालकांना आता एवढे तर नक्की समजले की माझ्या मुलाचा मेंदू हा चांगला असुन तो अजुनही खुप काही शिकु शकतो ही भावना त्यांच्या मनात जागृत झाली त्यामुळे तुषार आता येत्या वर्षापासून शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात सक्रीयपणे सहभागी होणार आहे. त्यामुळे तुषार नक्कीच उपचार व थेरेपीला प्रतिसाद देऊन एक दिवस स्वावलंबी होईल असा आत्मविश्वास नक्कीच आहे.
*श्री राहुल पाटील*
*विशेष शिक्षक,*
*गट साधन केंद्र शिरपुर.
No comments:
Post a Comment