*अपंग* हा शब्द कानावर पडल्याबरोबर आपल्या डोळ्यासमोर एक चित्र उभे राहते. त्यात एक हात तुटलेला, एक पाय तुटलेला किंवा दोन्ही पाय तुटलेले, दोन्ही हात तुटलेला, डोळ्यांमधे खाचा पडलेली एखादी व्यक्ती आपल्या डोळ्यासमोर सहज येऊन जाते. व ह्या व्यक्ती भिक मागत असतील या विचाराने आपल्या डोक्यात कधीकधी त्यांच्याविषयी घृणा, द्वेष किंवा प्रेम निर्माण होते. याचे कारण आपला त्यांच्या विश्वाशी कधीच संबंध आलेला नसतो. परंतु एकदा का आपण त्यांच्या विश्वात डोकावून पाहिले तर आपल्या डोळ्यासमोर आशेचा एक मोठा किरण दिसू लागतो. बालकांच्या बाबतीत बोलायचे झाले तर प्रत्येक दिव्यांग बालकामधे विशिष्ट प्रकारची वेगळी कौशल्य, कला ही लपलेलीच असते. गरज असते ती फक्त शोधाची. दिव्यांग मुलांची जगात आज अशी अनेक उदाहरणे आहेत ज्यांनी संपूर्ण जगाला दाखवून दिले की दिव्यांग व्यक्ती ही सर्वसामान्य व्यक्ती एवढेच नव्हे तर किंबहुना त्यापेक्षा सर्वश्रेष्ठ कर्तुत्व करू शकते. याचे ज्वलंत उदाहरण म्हणजे महान शास्त्रज्ञ स्टीफन हॉकिंग, लुई ब्रेल, हेलेन केलर, ब्लेड रनर ऑस्कर पिस्टोरियस, गौरी गाळगिळ या लोकांनी दिव्यांगांच्या क्षेत्राविषयी संपूर्ण जगाला विचार करायला भाग पाडले.
दिव्यांगांच्या क्षेत्रात काम करणे हे खरच खुप मोठे आव्हान आहे. अंधत्व आले म्हणुन त्यांचे सजीव सृष्टी व सौंदर्य यांचे नाते तुटते असे नाही. अंध मुलगा आपल्या ज्ञानेंद्रियांच्या उपयोगाने इतर संवेदना विकसित करण्यासाठी धडपड करतो. 'पाऊस पडतो' ही संकल्पना डोळ्यांनी अनुभवु शकत नाही. परंतु ध्वनी संवेदनाद्वारे पावसाच्या सरींचा आवाज, ढगांचा कडकडाट ऐकू शकतो. दैवाने दिलेल्या आव्हानांना सामोरे जावून स्वत्वाचा शोध घेणाऱ्या या व्यकतींची झुंज निच्छितच प्रशंसनीय आहे. एकीकडे धडधाकट माणसं मनातून पंगु झालेल्या या जगात 'पंगु' असलेल्या शरीरातील मन मात्र प्रचंड सामर्थ्यशाली. कायम नकारघंटा वाजवणारी सुदृढ मानसं एकीकडे आणि 'आई हे मला जमतय !' , बाबा मी हे करू का ? , सर, मला हे नक्की जमेल. असा आयुष्यात सकारात्मक दृष्टिकोण ठेवणारी मुले एकीकडे. निसर्गाने दृष्टि हिरावलेली ही द्रष्टे मुलं बघितली की सृष्टितल्या अनेक लोकांची कीव आल्याशिवाय राहत नाही. शेवटी एकच
*या मुलांना या फुलांना*
*रंग द्या अन गंध द्या*
*या पाकळ्यांना या कळ्यांना*
*साद द्या प्रतिसाद द्या*
लेखन:-श्री राहुल पाटील विशेष शिक्षक पंचायत समिती शिरपुर.
प्रचार व प्रसिद्धी :- मनोहर वाघ सर (तंत्रस्नेही साधनव्यक्ती,शिरपूर)
No comments:
Post a Comment